⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | धानोऱ्यात ग्रामपंचायतीच्या कुपनलिकांनी गाठला तळ ; गावातील पाणीपुरवठा विस्कळीत

धानोऱ्यात ग्रामपंचायतीच्या कुपनलिकांनी गाठला तळ ; गावातील पाणीपुरवठा विस्कळीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । मागील गेली पाच वर्षांपासून धानोरा सह परिसरात वरुण राजाने वक्रदृष्टी केल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिसरात मोठया प्रमाणावर बागायती शेती केली जाते. परंतु दिवसेंदिवस जमिनीतील पाणी पातळी कमीकमी होत असल्याने आता शेती शिवारासह गावात पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कुपनलिकांनीही ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला असल्याने याचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होऊन गावात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून नळांना पाणी आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होत असून मिळेल त्या सार्वजनिक नळांवर महिलांसह आबालवृद्धांची पाणी भरण्यासाठी तोबा गर्दी होते आहे.

पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत

नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ लागल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरसावले आहेत. त्यात माजी उपसभापती व ग्रामपंचायत सदस्य माणिकचंद महाजन यांनी आपल्या शेतातील कुपनलिकेचे पाणी थेट ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला जोडून पाण्याची टाकी भरून गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे. परंतु गावाची लोकसंख्या पाहता गावात एकाच दिवसात पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने दहा ते बारा दिवसात पाणी दिले जात आहे.

नवीन कुपनलिका करा 

गावात गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतची नवीन कुपनलिका केली गेली नाही. तर एकीकडे चौदावा वित्त आयोगाचा भरमसाठ  निधी गावच्या विकासकामांना वापरला गेला आहे तरीही मात्र गावात या निधीमधून एकही कूपनलिका न झाल्याने गावात सद्या पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गावातील पाण्याची मुख्य समस्या ग्रामपंचायतीच्या कार्यशील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी लक्ष घालून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.