Sawan Somwar 2021: पहिला श्रावण सोमवार, काय आहे महत्त्व जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात श्रावण महिना (Sawan Somwar) शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. तसंच या महिन्याला श्रावणाला (Sawan) व्रतवैकल्यांचा महिना म्हंटले जाते. श्रावणात भगवान श्री शंकरांची पूजा केली जाते. शंकराला पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक केला जातो. तसंच बेलाची पानं अर्पण केली जातात. महत्वाचे म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात आणि सांगता सोमवारीच होत असते. श्रावण महिन्यात पार्वती देवीने भगवान श्री शंकराला प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले असल्याने श्री शंकराला हा महिना खूप प्रिय असल्याचे म्हटले जाते.
उद्या ९ ऑगस्टपासून २०२१ सालातील श्रावण महिना सुरु होणार असून ६ सप्टेंबर रोजी श्रावण महिना संपेल. श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार, मंगळागौरी,नागपंचमी, अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते. या विशेष लेखात आम्ही श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा कशी करायची, शुभ मुहूर्त याबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता.
यावर्षी पहिला श्रावण सोमवार ९ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. पहिल्या श्रावण सोमवारपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होते. पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारी शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तीभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूजा पूर्ण झाल्याचे म्हटले जाते.
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास केला जातो. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. पण जर एखादी व्यक्ती आजारी असेल, गर्भवती महिला आणि वयोवृद्धांनी रात्रीच उपवास सोडला तरी चालतो. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर शिवशंकराचे ध्यान करावे.
श्रावण सोमवारी उपवास ठेवून महादेवाची मनोभावे पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. भगवान शंकर आणि माता पार्वतीची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात असे देखील म्हटले जाते.