रुग्णालय ‘नॉन कोविड’ झाल्याने रक्तदानासाठी नागिरकांनी पुढे यावे ; अधिष्ठाता डॉ. रामानंद
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । कोरोनाकाळात रक्ताची भासलेली गरज पाहता ज्या संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आणि अनेकांचे प्राण वाचविले अशांना मनापासून सलाम आहे. रक्तदान हि काळाची गरज आहे. आजपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ‘नॉन कोविड’ झाले असून रुग्णालयाच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे कोरोनाकाळात रक्तदान शिबीर आयोजित केलेल्या आयोजकांना गुरुवारी दि. २२ जुलै रोजी सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर प्रवीण धिमन, पोलीस मुख्यालयाचे आरपीआय संतोष सोनवणे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड, परिवहन कार्यालयाचे चंद्रकांत इंगळे, विकृतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. भारत घोडके, अधिसेविका प्रणिता गायकवाड मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी उदघाटन केले. त्यानंतर रक्तपेढीविषयी माहिती आणि कोरोनाकाळात करण्यात आलेले रक्तसंकलन याविषयी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. उमेश कोल्हे यांनी प्रस्तावनेत माहिती दिली. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. रामानंद म्हणाले की, समाजातील शेवटचा गोरगरीब घटक आहे, त्याला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी हे रुग्णालय आशादायी असते. त्यासाठी रक्तदान शिबीरच्या माध्यमातून केलेले रक्तदान हे गोरगरिबांचा आशीर्वाद मिळवून देते असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन रोहिणी देवकर व एल.एन. त्रिपाठी यांनी तर आभार डॉ. आकाश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाकरिता निलेश पवार, भरत महाले, पंकज चौधरी आदींनी परिश्रम घेतले. नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी रक्तपेढीला भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.