जामनेर

जामनेरच्या गोगडी धरणात बोट उलटली; चौघे बुडता बुडता वाचले

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील पहूरजवळ असलेल्या गोगडी धरणात बोट उलटल्याची थरारक घटना घडली. बोटीतून प्रवास करणाऱ्या दोन तरुणी, त्यांचा चुलत भाऊ आणि बोटचालक असे चौघेही धरणाच्या पाण्यात पडले. तब्बल तासभर बोटीला धरून ठेवत चौघांचा जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू होता. अखेर चार युवकांनी धाडसाने मदतकार्य करत चौघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, डाभुर्णी येथील खुशी लखन परदेशी ही पाहुणी म्हणून पळसखेडा, ता. सोयगाव येथे आली होती. खुशी परदेशी, अचल संजय कवाल आणि तिचा चुलत भाऊ अमोल रूमसिंग कवाल हे गोगडी धरण परिसरातील शेतात गेले होते. शेताच्या दुसऱ्या काठावर जाण्यासाठी ते बोटचालक आनंदा काशिनाथ भिल यांच्या प्लास्टिकच्या बोटीतून प्रवास करीत होते.

बोट धरणाच्या मध्यभागी पोहोचली असताना अचानक तिचा तोल जाऊन ती उलटली. त्यामुळे बोटीतील चौघेही पाण्यात पडले. मात्र, त्यांनी बोटीला घट्ट पकडून ठेवले आणि मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजाने परिसरातील शेतकरी धरणाजवळ धावून आले.

चार युवक बनले देवदूत; चौघांचे प्राण वाचविले

घटनेची माहिती मिळताच पहूर पेठचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मदतकार्याला वेग देण्यात आला. चार युवकांनी पाण्यातील ट्यूब आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जॅकेट यांच्या साहाय्याने उलटलेल्या बोटीजवळ जाऊन चौघांना सुरक्षित बाहेर काढले.

तब्बल तासभर पाण्यात बोटीला धरून चौघांचा जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू होता. अखेर मदत मिळाल्याने चौघांचे प्राण वाचले आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, नायब तहसीलदार नानासाहेब आगळे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. चार युवकांनी दाखविलेल्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button