
जळगाव लाईव्ह न्यूज । दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या परीक्षा शुल्कमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयाचा जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४९ हजार २७९ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्कापैकी ५० टक्के रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यासाठी जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांना ६ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. तर धुळे जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ८४ लाख रुपये पुढील आठवड्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परीक्षा शुल्काचा काही भाग परत मिळणार असल्याने विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय झालेला असतानाही विद्यार्थ्यांकडून हमीपत्रे का मागितली जात आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ही अट तातडीने रद्द करून शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनाही परीक्षा शुल्कमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी केली आहे.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, सर्व पात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही अतिरिक्त अटीशिवाय तातडीने लाभ मिळावा, अशी मागणीही पुढे येत आहे.





