गुन्हेजळगाव शहर

जळगावात गोमांस विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई ; ५५ किलो गोमांसासह १९ हजारांचा मुद्देमाल जप्त!

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील इस्लामपुरा परिसरात प्रतिबंधित गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५५ किलो गोमांसासह एकूण १९ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित गोमांस विक्री, वाहतूक तसेच अवैध गोवंश वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय यंत्रणा सतर्क ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या पथकाला कारवाईबाबत मार्गदर्शन केले.

दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत इस्लामपुरा परिसरातील मदिना मशिदीजवळ प्रतिबंधित गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटोळे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर आणि पोलीस अंमलदार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. यावेळी मदिना मशिद परिसरात एक इसम गोमांस विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव कुरेशी सज्जाद खान युसुफ, वय २४ वर्षे, रा. घर नं. २१, इस्लामपुरा, जळगाव असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून प्रतिबंधित गोमांस विक्री व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

असा आहे जप्त मुद्देमाल

या कारवाईत ५५ किलो वजनाचे गोमांस (११ हजार रुपये), चार लोखंडी सुरी (८०० रुपये), एक वजनकाटा (८०० रुपये), एक जुना फ्रीज (१ हजार १०० रुपये), लोखंडी लाकडी दांडा असलेली कुन्हाड (५०० रुपये), तीन मस्कुला (२०० रुपये), एक वजनकाटा (५०० रुपये), दोन किलो वजनाचे दोन मापे (२०० रुपये), एक किलो वजनाचे एक माप (१०० रुपये), ५०० ग्रॅम वजनाचे एक माप (५० रुपये), मोठे अॅल्युमिनियमचे पातेले (३ हजार रुपये) आणि चार स्टीलचे हंडे (१ हजार ४०० रुपये) असा एकूण १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस पथक करीत आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटोळे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, पोलीस हवालदार विजय शिंदे, योगेश जाधव, अनिल सांळुके, श्रीकांत पाटील, रविंद्र इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल बाजारी, पराग दुसाने, गजानन वाघ, निलेश धुडे, नवनीत चौधरी आणि सतीश भारळे यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button