नोकरी संधी

नाशिक महापालिकेत नोकरीची संधी; २०४ पदांसाठी भरती! १ लाख १० हजारांपर्यंत पगार मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध १८ संवर्गांतील एकूण २०४ रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर झालीय. या भरती प्रक्रियेद्वारे वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक, संगणक ऑपरेटर आणि तंत्रज्ञ अशा विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.

या भरतीसाठी आज म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२६ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना २ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ही भरती मानधन तत्त्वावर आणि तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

नाशिक महापालिकेच्या या भरतीमध्ये स्टाफ नर्स पदासाठी सर्वाधिक ७९ जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल एएनएम पदासाठी ५७, वैद्यकीय अधिकारी आणि मिश्रक पदासाठी प्रत्येकी १५, तर संगणक ऑपरेटर पदासाठी १० जागा आहेत. याशिवाय विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या २८ जागा भरल्या जाणार आहेत.

दरमहा किती मिळणार मानधन?

या भरतीतील शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाख १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी ७५ हजार रुपये, तर स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी दरमहा २३ हजार ४५५ रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.

कशी होणार उमेदवारांची निवड?

उमेदवारांची निवड एकूण १०० गुणांच्या आधारे केली जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षातील गुणांना ५० टक्के, तर मुलाखतीला ५० टक्के महत्त्व दिले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

अर्ज कुठे आणि कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत https://nmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरतीसंदर्भातील अर्ज व सविस्तर सूचना तपासाव्यात. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ असून, इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button