
जळगाव लाईव्ह न्यूज । कजगाव-पारोळा रोडवरील सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २२, रा. कजगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून, हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन राउंड फायरिंग केली. यातील एक गोळी जयेशच्या डोक्यात लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याची प्रकृती गंभीर असून, त्याला तातडीने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे कजगावसह भडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश पवार हा कजगाव-पारोळा रोडवरील सौर ऊर्जा प्रकल्पावर कामासाठी जात असताना प्रकल्पाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. अचानक झालेल्या गोळीबारात तीन राउंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्याच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले.
मागील वर्षी केला होता प्रेमविवाह
जयेश पवार याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. विशेष म्हणजे, जयेशने मागील वर्षीच प्रेमविवाह केला होता. तरुण वयातच कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयेशवर झालेल्या या हल्ल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. गोळीबार करणारे हल्लेखोर कोण होते, त्यांची संख्या किती होती, तसेच हा हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
कामासाठी जात असलेल्या तरुणावर भररस्त्यात गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने अटक करून गोळीबारामागील कारण उघड करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




