जळगाव जिल्हा

खात्यात अवघे २४ रुपये, मुंबई गाठली अन् रचला इतिहास; जळगावच्या भूषण ठाकरेने ‘KBC-18’ मध्ये जिंकले १ कोटी रुपये!

जळगाव लाईव्ह न्यूज । तीव्र इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर जळगाव जिल्ह्यातील भूषण ठाकरे या तरुणाने ‘कौन बनेगा करोडपती १८’ (KBC 18) या लोकप्रिय शोमध्ये १ कोटी रुपये जिंकून इतिहास रचला आहे. या पर्वातील तो पहिला करोडपती ठरला असून, मुंबईत स्पर्धेसाठी येताना त्याच्या बँक खात्यात अवघे २४ रुपये होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भूषण ठाकरे २०१६ पासून केबीसीच्या हॉटसीटवर बसण्यासाठी प्रयत्न करत होता. अनेकदा अपयश आणि निराशा पदरी पडूनही त्याने हार मानली नाही. अखेर यावर्षी त्याच्या ज्ञानाला नशिबाची साथ मिळाली. ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देता आले नसले तरी, १ कोटी रुपयांचा टप्पा पार करत त्याने मोठी झेप घेतली. विशेष म्हणजे, केबीसीच्या टीमनेच त्याच्या घरापासून सेटपर्यंतच्या प्रवासाचा सर्व खर्च उचलला होता.

आईच्या उपचारांसाठी पैशांची चणचण, वडील रोजंदारीवर

एका मुलाखतीत बोलताना भूषणने आपल्या संघर्षाचा प्रवास उलगडला. त्याचे वडील रोजंदारीवर मजुरी करतात, तर आई नेहमीच आजारी असल्याने तिच्या उपचारांसाठी सतत पैशांची गरज भासते. वडिलांना नियमित काम मिळाल्यास कुटुंबाचे मासिक उत्पन्न १५ ते २० हजार रुपयांपर्यंत जाते. दीड वर्षापूर्वी “काहीतरी करून दाखवल्याशिवाय घरी परतणार नाही,” असा निश्चय करून त्याने घर सोडले आणि भुसावळमध्ये राहून यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली.

नातेवाईकांचे टोमणे ते आता अभिनंदनाचे फोन

गरिबीमुळे अनेकदा नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले. आईच्या उपचारांसाठी एक हजार रुपयांची मदतही न करणारे आणि फोन न उचलणारे नातेवाईक आता करोडपती झाल्यानंतर स्वतःहून फोन करून अभिनंदन करत असल्याचे भूषणने सांगितले.

जिंकलेल्या रकमेतून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार

केबीसीमध्ये जिंकलेली १ कोटी रुपयांची रक्कम ही त्याच्या कुटुंबाच्या पुढील ३० ते ३५ वर्षांच्या उत्पन्नाइतकी आहे. या पैशांमधून आता आई-वडिलांना मजुरी करावी लागणार नाही, तसेच आईच्या उपचारांचा खर्चही भागेल. यासोबतच आईसाठी दागिने खरेदी करणे आणि एका चांगल्या संस्थेत प्रवेश घेऊन यूपीएससीचा अभ्यास पुढे सुरू ठेवण्याचे भूषणचे स्वप्न आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button