
जळगाव लाईव्ह न्यूज । तुलसी विवाह पार पडल्यानंतर आता सनई-चौघड्यांचे सूर घुमू लागले असून लग्नसराईला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आगामी २०२७ मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत विवाहासाठी ५८ मुहूर्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वधू-वरांच्या कुटुंबांकडून लग्नाच्या तारखा निश्चित करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर मंगल कार्यालये, लॉन्स, केटरर्स, बँड पथके, फोटोग्राफर आणि सजावट व्यावसायिकांनाही आगामी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
मात्र, यंदाच्या विवाह हंगामात काही अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने विवाह सोहळ्यांच्या आयोजनाचा खर्च वाढण्याची चिन्हे आहेत. लग्नासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी आयोजकांना स्वतंत्र व्यवस्था करावी लागू शकते. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मोठ्या थाटामाटातील विवाहांऐवजी साधेपणाने आणि मर्यादित खर्चात लग्न करण्याला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरपासूनच काही विवाह तिथी उपलब्ध
मुख्य विवाह हंगाम जानेवारी २०२७ पासून सुरू होणार असला, तरी काही विशेष परिस्थितींमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही विवाहासाठी आपत्कालीन तिथी देण्यात आल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये २५ आणि २६ तारखेला विवाह करता येणार आहेत. तर डिसेंबरमध्ये २, ३, ४, ५, १०, १२, १३, १४, १५, १८, १९, २७, २८, ३० आणि ३१ या तारखा देण्यात आल्या आहेत.
याशिवाय जानेवारी २०२७ मधील १, २, ४, २० आणि २४ या तारखांचाही आपत्कालीन मुहूर्तांमध्ये समावेश आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृती, परदेशात नोकरी करणाऱ्या वधू-वरांच्या सुट्ट्या किंवा अन्य कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन अशा तिथींचा विचार केला जातो.
सहा महिन्यांतील विवाह मुहूर्तांच्या तारखा
आगामी विवाह हंगामातील मुख्य मुहूर्तांची महिनानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे.
जानेवारी २०२७ : २६, २७ आणि २९
फेब्रुवारी : २, ३, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २३, २४, २५, २७ आणि २८
मार्च : २, ४, १०, ११, १४, २०, २४, २५, २७, २९ आणि ३१
एप्रिल : १, २, ३, १६, १९, २१, २६, २८, २९ आणि ३०
मे : ८, ९, १३, १४, १५, १६, १७, १९, २१, २२, २५, २६ आणि ३०
जून : १, ११, १२, १३, १५, १७, १९, २३ आणि २४
यंदाच्या विवाह हंगामात सिंहस्थाचाही संदर्भ महत्त्वाचा ठरत आहे. आगामी काळात ५८ मुहूर्त असल्याचे सांगितले जात असले, तरी सिंहस्थामुळे प्रत्यक्षात शुभ विवाह तिथी कमी असल्याचे मत काहींकडून व्यक्त केले जात आहे. सिंहस्थाच्या काळात विवाह करणे योग्य आहे का, कोणते मुहूर्त ग्राह्य धरावेत, याबाबत पालक आणि वधू-वरांच्या कुटुंबांमध्ये संभ्रम आहे.
त्यामुळे लग्नाची तारीख ठरवण्यापूर्वी पंचांग आणि ज्योतिषांचा सल्ला घेण्याकडे अनेकांचा कल आहे. एकीकडे विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे पाणीटंचाई आणि वाढत्या खर्चामुळे यंदाची लग्नसराई कशी पार पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





