
जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या तीन दिवसांपासून हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा जोर सोमवारी अचानक काहीसा कमी झाला. सलग तीन दिवस ८ अंशांवर स्थिरावलेले जळगावचे किमान तापमान थेट १३.२ अंशांवर पोहोचले. अवघ्या २४ तासांत किमान तापमानात ५.२ अंशांची वाढ झाली असून यामुळे जाणवणारी थंडी ओसरली आहे.
जळगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली होती. किमान तापमान ८ अंशांपर्यंत खाली आल्याने पहाटेच्या वेळी चांगलीच हुडहुडी भरत होती. मात्र, सोमवारी वातावरणातील बदलामुळे रात्रीची थंडी अचानक कमी झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७९ टक्क्यांवर नोंदवण्यात आले.
हवामानातील या बदलामागे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा कमी झालेला वेग आणि वाढलेली आर्द्रता कारणीभूत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. थंड, कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने रात्री जमिनीतील उष्णता बाहेर जाण्याचा वेग मंदावला. त्यामुळे किमान तापमानात अचानक वाढ झाली.
मात्र, थंडीचा हा ब्रेक फार काळ टिकणार नसल्याचे संकेत आहेत. आज मंगळवारपासून किमान तापमानात पुन्हा हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी जळगावचा पारा पुन्हा १० अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. पावसाची शक्यता नसल्याने आगामी दिवसांत दिवसा सौम्य उकाडा आणि रात्री पुन्हा वाढणारी थंडी, असे हवामान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.





