
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीचा सण संपताच आता लग्नसराईचे वेध लागले आहेत. अशातच सोने आणि चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र कायम असून, मागील २४ तासांत चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची, तर सोन्याच्या भावात १०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो १ लाख ७९ हजार रुपये, तर सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख ३६ हजार ९०० रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.
चार दिवसांपासून घसरणीचे सत्र सुरू
दिवाळी पाडव्यापासून सोने-चांदीच्या बाजारात दर घसरण्याचा कल दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही धातूंच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. १३ नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची घसरण होऊन भाव १ लाख ८१ हजार रुपये प्रतिकिलोवर आले होते. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी पुन्हा दोन हजार रुपयांची घट झाली. त्यामुळे चांदीचा भाव आता १ लाख ७९ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
दुसरीकडे, सोन्याच्या दरातही घसरण कायम आहे. १३ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव दोन हजार रुपयांनी कमी होऊन १ लाख ३७ हजार रुपये प्रतितोळा झाला होता. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी आणखी १०० रुपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे सोन्याचा दर १ लाख ३६ हजार ९०० रुपयांवर आला आहे.
११ महिन्यांतील सर्वात नीचांकी दर
सोने आणि चांदीचे सध्याचे दर गेल्या ११ महिन्यांतील नीचांकी पातळीवर असल्याचे बाजारातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यापूर्वी ५ डिसेंबर २०२५ रोजी चांदीचा भाव १ लाख ७९ हजार ८०० रुपये प्रतिकिलो होता. तर २५ डिसेंबर २०२५ रोजी सोन्याचा दर १ लाख ३६ हजार २०० रुपये प्रतितोळा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही धातूंच्या किमतींनी मोठी उसळी घेत नवनवे उच्चांक गाठले होते.
आता दिवाळीनंतर दरांमध्ये झालेल्या घसरणीमुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आगामी काळात सोने-चांदीचे भाव कोणत्या दिशेने जातात, याकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.





