जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला; नागरिकांमध्ये घबराट

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागांना आज शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी ९.१८ ते ९.२० वाजेच्या सुमारास जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ४.५ मॅग्निट्यूड असल्याचे समजते. या भूकंपाचे केंद्र मध्य प्रदेशातील खरगोन येथे असल्याची माहिती समोर येत आहे.

जळगाव शहरासह भुसावळ, यावल, रावेर आणि बोदवड आदी तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने तसेच पलंग आणि बेड हादरल्याचा अनुभव अनेक नागरिकांनी घेतला. काही क्षणांसाठी जमिनीला कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

दरम्यान, भूकंपाची तीव्रता ४.५ मॅग्निट्यूड आणि केंद्र मध्य प्रदेशातील खरगोन असल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात समोर आली असली, तरी याबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. दरम्यान, हा भूकंप मध्यम स्वरूपाचा असल्याने कोठेही पडझड, जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button