जळगाव जिल्हा

दुष्काळात शेतकरी आणि पशुपालकांना वाऱ्यावर सोडणार नाही ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यासाठी पशुधन हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्याच्या कुटुंबाचा आधार आहे. शेतीचे नुकसान झाले तरी पशुधनच त्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देते. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांसह त्यांच्या पशुधनाचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण होण्यापूर्वीच उत्पादन, साठवणूक आणि उपलब्धतेचे नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळात शेतकरी आणि त्याच्या पशुधनाला वाऱ्यावर सोडणार नाही; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ४०० हून अधिक शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. तसेच सुरवातीला चारा साक्षरता अभियान रथाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यासाठी ७४१ क्विंटल वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सागर कोल्हे, चंद्रकांत बोडरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते.

चारा टंचाईपूर्वीच उपाययोजना करा

जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू झाल्या असून चाऱ्याच्या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. प्रत्येक गावातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि आगामी गरजांचा आढावा घेऊन गावनिहाय नियोजन करावे. आवश्यकतेनुसार चारा डेपो, जनावरांसाठी पिण्याचे पाणी, लसीकरण आणि पशुवैद्यकीय उपचारांची व्यवस्था सुनिश्चित करावी. शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाल्यानंतर नव्हे, तर त्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक गाव चारा उत्पादनात स्वावलंबी व्हावे

केवळ बियाणे वाटप न करता त्यातून प्रत्यक्ष चारा उत्पादन वाढले पाहिजे. उपलब्ध पाणी व जमिनीनुसार चारापिकांची लागवड, मुरघास निर्मिती आणि चारा साठवणुकीसाठी पशुसंवर्धन व कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. योग्य व्यवस्थापनातून चाऱ्याची बचत होऊन पशुपालकांचा खर्च कमी होईल. प्रत्येक गावाने चारा उत्पादनात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह शेतकऱ्यांनी एकजुटीने परस्परांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शेतातील एकही काडी वाया जाऊ देऊ नका – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, आगामी ऑगस्ट २०२७ पर्यंतची संभाव्य चारा गरज लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन आवश्यक आहे. शेतातील एकही काडी वाया न घालवता तिचा पशुधनासाठी उपयोग करावा. पीक अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे उपयुक्त चाऱ्यात रूपांतर करावे. यासाठी गेल्या महिनाभरापासून चारा साक्षरता रथ, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना क्षेत्रीय स्तरावर सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त चारा शासनामार्फत खरेदी करणार – करिष्मा नायर

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी पशुपालकांना वैरण बियाण्यांची लागवड करून चारा उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले. आगामी काळासाठी पुरेसा चारा उपलब्ध ठेवावा. अतिरिक्त चारा उत्पादन झाल्यास तो शासनामार्फत खरेदी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाभरातील चारा साक्षरता अभियानात शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.

पालकमंत्र्यांकडून चारा व्यवस्थापन प्रात्यक्षिकांची पाहणी

कार्यक्रमस्थळी मुरघास निर्मिती, पशुखाद्य बचत, निकृष्ट चारा सकस करण्याच्या पद्धती, अझोला, हायड्रोपोनिक चारा उत्पादन आणि मुक्त गोठा व्यवस्थापनासंदर्भात माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. पालकमंत्री पाटील यांनी स्टॉलना भेट देऊन प्रात्यक्षिकांची पाहणी केली व संबंधितांकडून माहिती घेतली. कार्यक्रमाला शेतकरी, पशुपालक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील यांनी केले, तर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आभार मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button