
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील वर्ग-१ चे उपविभागीय अधिकारी सतीश मनसुलाल शिसोदे याच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी केली असता तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८१ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, प्लॅटिनम तसेच स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू आढळल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सतीश मनसुलाल शिसोदे (वय ५५) हे जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याचे निवासस्थान जळगाव शहरातील स्वामी विवेकानंद सोसायटी, आदर्श नगर परिसरात आहे. त्याच्या विरोधात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
या तपासणीत त्यांच्या मालमत्तेचा मोठा तपशील समोर आला आहे. घरझडतीदरम्यान ७ लाख १७ हजार ९२० रुपयांची रोख रक्कम आढळली. तसेच आदर्श नगर परिसरातील दोन घरांची किंमत अनुक्रमे ४५ लाख आणि ६५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय घरातील अंदाजित वस्तूंची किंमतही मालमत्तेच्या तपशिलात समाविष्ट करण्यात आली आहे.
शिसोदे याच्या जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मौल्यवान दागिन्यांचा मोठा साठा आढळून आला. त्यामध्ये २ हजार ५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे. चेन, पेंडल, लॉकेट, बांगड्या तसेच सोन्याच्या पट्ट्यांचाही यात समावेश असून, या सोन्याचे मूल्य ३ कोटी ५१ लाख ८९ हजार १५३ रुपये इतके आहे.
याशिवाय लॉकरमध्ये ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळल्या. चांदीची बिस्किटे, वाट्या, ताटे आणि इतर वस्तूंची किंमत १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये आहे. विशेष म्हणजे, १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही पथकाच्या हाती लागले. त्यांचे मूल्य ३ लाख ५५ हजार २८६ रुपये आहे. अशा प्रकारे केवळ बँक लॉकरमधील सोन्या-चांदीसह प्लॅटिनमच्या दागिन्यांची एकूण किंमत ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये झाली आहे.
घरझडती आणि बँक लॉकरमधील ऐवज तसेच स्थावर मालमत्ता आणि इतर वस्तूंची एकत्रित किंमत तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८१ रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कारवाईला नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.





