जळगाव जिल्हाभुसावळ

नागपूर-मुंबई मार्गावर आणखी २ विशेष गाड्या धावणार; जळगाव, भुसावळसह चाळीसगावला थांबा

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी आणि छटपूजेच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर-मुंबई मार्गावर दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे विशेष या गाडीला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव आणि भुसावळला थांबा देण्यात आला आहे. यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (आठ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१०८४/०१०८३ नागपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या एकूण ८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. नागपूर येथून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारी गाडी ५, ७, १० आणि १२ नोव्हेंबर रोजी प्रस्थान करेल. या गाडीच्या नागपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशा एकूण ४ फेऱ्या होतील. तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नागपूरकडे जाणारी विशेष गाडी ६, ८, ११ आणि १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रवाना होईल. या दिशेनेही एकूण ४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

दुसरी विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०१०८५/०१०८६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)–नागपूर विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नागपूरकडे जाणारी ही गाडी ७ आणि ९ नोव्हेंबर रोजी सुटणार असून या दिशेने २ फेऱ्या होतील. नागपूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी गाडी ८ आणि १० नोव्हेंबर रोजी रवाना होईल. या दिशेनेही २ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. अशा प्रकारे या दुसऱ्या विशेष रेल्वेगाडीच्या एकूण ४ फेऱ्या होणार आहेत.

या प्रमुख स्थानकांवर थांबे

विशेष रेल्वेगाड्यांना उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी तसेच मुंबईहून आपल्या गावी परतण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button