जळगाव जिल्हा

दिवाळीत प्रवाशांना दिलासा! जळगावमार्गे मुंबई-नागपूर विशेष एक्स्प्रेस धावणार; हटिया ट्रेनलाही मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी आणि छठ उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर असून मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा तसेच काही विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरदरम्यान आठ विशेष फेऱ्या चालविण्याचा निणर्य घेतला आहे. या गाडीला जळगाव आणि भुसावळसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया विशेष रेल्वेच्या सेवेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या आठ फेऱ्या

गाडी क्रमांक ०१०८९ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ९.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूरला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०९० नागपूर येथून ६ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी आणि सोमवारी सायंकाळी ४.१० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

जळगाव, भुसावळसह या स्थानकांवर थांबे

या विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेसला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत.

मुंबई-हटिया विशेष ट्रेनलाही मुदतवाढ

दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या सेवेतही मध्य रेल्वेने वाढ केली आहे. यापूर्वी ऑक्टोबरअखेरपर्यंत अधिसूचित असलेल्या या गाड्या आता नोव्हेंबर महिन्यातही धावणार आहेत.गाडी क्रमांक ०८६१० लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी धावेल. तर गाडी क्रमांक ०८६०९ हटिया येथून २ ते ३० नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी सुटेल. या दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी पाच अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे झारखंडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध

या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रांसह आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अनारक्षित डब्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे सामान्य दराने काढता येणार आहेत. तसेच रेलवन ॲपवरूनही तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि इतर माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा एनटीईएस ॲपला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button