
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. दिवाळीच्या काळात रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले असून खासगी स्लिपर बसच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक फटका बसत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीने दिलासा दिला आहे. यंदा हंगामी भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जळगाव विभागातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. याच दरम्यान, रेल्वेचं आरक्षण तिकीट मिळणे कठीण असते. यातच खासगी बसचालकांकडून दुप्पट तिप्पट लूट केली जते. सामान्य दिवसांत पुणे ते जळगाव प्रवासासाठी ६०० ते १ हजार रुपयांपर्यंत असणारे भाडे, ऐन दिवाळीत चक्क २ ते ३ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने प्रवाशांचे बजेट कोलमडत आहे. अशा वेळी एसटी महामंडळाने प्रवाशांना मोठा आधार दिला आहे.
पुण्याहून जळगावसाठी ११ जादा गाड्यांचे नियोजन
दिवाळीतील गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या जळगाव विभागाने ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये जळगाव आगाराच्या चार, तर रावेर आगाराच्या दोन बसेसचा समावेश आहे. याशिवाय चाळीसगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर आणि एरंडोल या आगारांकडून प्रत्येकी एक जादा बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नियोजनानुसार एकूण ११ जादा बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. विशेषतः पुण्याहून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या मार्गावर अधिक गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मागील वर्षी भाडेवाढ, यंदा मात्र दर कायम
दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एसटी महामंडळाकडून काही वर्षांत हंगामी भाडेवाढ केली जाते. मागील वर्षीही दिवाळीदरम्यान नियमित भाड्यात अल्पशी वाढ करण्यात आली होती. मात्र, यंदा एसटीने हंगामी भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. चिंचवड (पुणे) ते जळगाव या मार्गावर एसटीच्या साध्या आसनी बसचे नियमित भाडे ७२० रुपये आहे. यंदाही हेच भाडे कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खासगी बसच्या तुलनेत एसटीने प्रवास करणे प्रवाशांसाठी अधिक परवडणारे ठरणार आहे.
नाशिक, उधना मार्गावरही जादा गाड्या
दिवाळीनिमित्त मुंबई, नागपूर आणि सुरत येथूनही मोठ्या संख्येने प्रवासी आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे या मार्गांवरील गर्दी लक्षात घेऊन एसटीकडून अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यानंतर नाशिक आणि उधना येथूनही वाढीव बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एकीकडे रेल्वेचे आरक्षण मिळवण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असताना, तर दुसरीकडे खासगी बसच्या वाढीव भाड्यामुळे प्रवास महागला आहे. अशा परिस्थितीत एसटीच्या जादा गाड्या आणि कायम ठेवलेले नियमित भाडे यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.





