
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव–भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर डंपर आणि गुजरातकडून नागपूरकडे जाणाऱ्या सोयाबीनच्या ट्रकमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात रमेश चंद्र यादव (क्य ५६, रा. उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला, तर डंपरचालक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गावर सुमारे ३ तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून नागपूरच्या दिशेने सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एमएच ४० बीजी ६२८७) रमेश चंद्र यादव चालवत होते. गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर या ट्रकची दीपनगर येथून जळगावकडे राख घेऊन जाणाऱ्या डंपरशी (क्रमांक एमएच १५ जीडब्ल्यू ३८७९) जोरदार धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचालक रमेश यादव केबिनमध्ये अडकून पडले. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.
क्रेनच्या मदतीने चालकाला बाहेर काढले
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक सतीश बेलसरे, त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर क्रेनच्या साहाय्याने ट्रक हलवून तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रमेश यादव यांना बाहेर काढण्यात यश आले.
त्यानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महामार्गावर तीन तास वाहतुकीचा खोळंबा
या अपघातात डंपरचालक मुक्तचर अली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. दोन्ही वाहनांचे नुकसान आणि बचावकार्यामुळे महामार्गावर सुमारे तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.





