जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यावर अवकाळीचे संकट! ५ नोव्हेंबरपर्यंत अवकाळीचा मुक्काम? वाचा हवामान अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असून, नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा परिणाम जळगाव जिल्ह्याच्या वातावरणावर होत असून २८ ऑक्टोबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण होते. दरम्यान, हे चक्रीवादळ छत्तीसगड आणि विदर्भाच्या दिशेने सरकत असल्याने जिल्ह्यात २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार, २९ आणि ३० ऑक्टोबरदरम्यान जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ढगाळ वातावरण राहू शकते. ३१ ऑक्टोबर रोजीही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात हे ढगाळ आणि पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबरपासून वातावरणात बदल होऊन आकाश निरभ्र होईल आणि जिल्ह्यात खऱ्या अर्थाने थंडीचे आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसमोर पिकांच्या संरक्षणाचे आव्हान

सध्या शेतीची विविध कामे सुरू असून, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काढणीला आलेली पिके, शेतातील कापूस आणि काढणीनंतर शेतात ठेवलेला शेतमाल यांना पावसाचा फटका बसू शकतो. पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. कापूस तसेच इतर शेतीमालाची काळजी घ्यावी आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत.

एकीकडे दिवाळीचा उत्साह, तर दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता, अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष आता पुढील काही दिवसांच्या हवामानाकडे लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button