यावलराजकारण

यावल नगरपरिषदेत राजकीय भूकंप! काँग्रेस नगरसेवक अपात्र

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नगरसेवक शेख निसार हमीद यांना तीन अपत्यांच्या प्रकरणात नगरसेवकपदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त जनार्दन पवार यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे शेख निसार हमीद यांचे नगरसेवकपद रिक्त झाले असून, यावल नगरपरिषदेतील सत्तेच्या गणितावरही त्याचा परिणाम झाला आहे.

शेख निसार हमीद यांच्याविरोधात यावल येथील उमेश रेवा फेगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेख निसार यांना एकूण चार अपत्ये असून, त्यांच्या चौथ्या अपत्याचा जन्म ६ जून २००३ रोजी झाल्याचा पुरावा तक्रारदाराने सादर केला होता.

मात्र, नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात १२ सप्टेंबर २००१ नंतर एकही अपत्य जन्माला आले नसल्याचे नमूद करण्यात आल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि उपलब्ध जन्मनोंदी यांच्यातील विसंगती हा या प्रकरणातील मुख्य मुद्दा ठरला.

तीन वेळा सुनावणी; अखेर अपात्रतेचा निर्णय

या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयात ४ ऑगस्ट, १८ ऑगस्ट आणि १८ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित चौथ्या अपत्याचा जन्म २००३ मध्ये झाल्याचे सिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर सहआयुक्त जनार्दन पवार यांनी शेख निसार हमीद यांना नगरसेवकपदासाठी अपात्र घोषित केले.

या निर्णयामुळे यावल नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक राजकारणात या निकालाचे महत्त्व वाढले असून, आगामी काळात या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

शेख निसार हमीद यांच्या अपात्रतेचा परिणाम यावल नगरपरिषदेतील सत्तेच्या गणितावर होण्याची शक्यता आहे. शहरात सत्ताधारी महाविकास आघाडीकडे यापूर्वी तंतोतंत बहुमत होते. काही प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षांचे अतिरिक्त मत वापरण्याची संधीही होती. मात्र, आता सत्ताधारी गटातील एका सदस्याचे संख्याबळ कमी झाल्याने महत्त्वाच्या ठरावांच्या वेळी राजकीय समीकरणे बदलू शकतात.

दरम्यान, या निकालावर आपण समाधानी नसून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या आदेशाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे शेख निसार यांनी स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button