गुन्हेजळगाव जिल्हा

नेव्हरे धरणात बुडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; शोधमोहीमेनंतर आढळला मृतदेह

जळगाव लाईव्ह न्यूज । शिरसोली प्र. न. येथील ५५ वर्षीय प्रौढाचा नेव्हरे धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय. कैलास हरि चव्हाण (मराठे) (वय ५५) असं मयताचे नाव आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या कैलास चव्हाण यांचा मृतदेह आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेमुळे शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास चव्हाण हे काल गुरुवारी दुपारपासून बेपत्ता होते. शिरसोली-नेव्हरे शिवारात त्यांची शेती असून, ते काल शेतात गेले होते. त्यांच्या शेतापासून काही अंतरावर नेव्हरे धरण असल्याने ते धरणात पोहण्यासाठी गेले असावेत, असा संशय नातेवाइकांना आला. त्यानुसार धरण परिसरात शोध घेतला असता पाण्याच्या काठावर त्यांचा रुमाल आढळून आला. त्यामुळे नातेवाइकांची चिंता अधिकच वाढली.

आज सकाळपासून कैलास चव्हाण यांचा मुलगा आणि इतर नातेवाइकांनी धरण परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. अखेर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास धरणाच्या पाण्यावर त्यांचा मृतदेह दिसून आला. मृतदेहाची ओळख पटताच नातेवाइकांनी गावातील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना घटनेची माहिती दिली.

यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कैलास चव्हाण यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button