
जळगाव लाईव्ह न्यूज । दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवणे आणि चारा टंचाईवर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. याच उद्देशाने पाळधी येथे चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचे आयोजन करण्यात आले. पशुवैद्यकीय चिकित्सालय, पाळधी आणि जीपीएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभियानात चारा नियोजन, मुरघास निर्मिती आणि आधुनिक चारा उत्पादन पद्धतींबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी पशुपालकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. चारा टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल शिंदे आणि डॉ. जे. एस. नारखेडे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. अशोक महाजन यांनी केले, तर राहुल साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.
मुरघास निर्मितीचे प्रात्यक्षिक
अभियानांतर्गत बांभोरी येथील पशुखाद्य उद्योजक योगेश पाटील यांनी मुरघास निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली. सुमारे ५०० शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून मका पिकापासून बेलर मशीनच्या साहाय्याने मुरघास कसा तयार केला जातो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. दुष्काळी काळात जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी मुरघास हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, याचे महत्त्वही या प्रात्यक्षिकातून अधोरेखित झाले.
दरम्यान, सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पात्र शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील चारा बियाण्यांसाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली. या अभियानामुळे पशुपालकांना चारा नियोजन, संवर्धन आणि आधुनिक चारा उत्पादन पद्धतींबाबत उपयुक्त माहिती मिळाली.





