
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रथम,तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन, द्वितीय क्रमांक; विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन
जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, जळगाव येथे विविध विद्यार्थी समित्यांचा स्थापना समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सांघिक भावना, तांत्रिक कौशल्ये आणि सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, परीक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.या वेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन या विद्यार्थी संघटनांच्या नवनियुक्त पदाधिकार्यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज प्रदान करण्यात आले.प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समित्यांमधील पदाधिकार्यांनी आपापल्या जबाबदार्या समर्पणाने पार पाडाव्यात, असे आवाहन केले.
समित्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण तंत्रनिकेतन संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. अमिता महाजन आणि तंत्रनिकेतन विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. कल्याणी पाटील यांनी केले. या स्पर्धेत उएडअ समितीने प्रथम क्रमांक, तर चएडअ समितीने द्वितीय क्रमांक पटकावला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिद्धी भिरूड, गुंजन महाजन, संजना गवई आणि कीर्ती बोरोले यांनी केले. शेवटी सामूहिक छायाचित्र घेऊन आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या समारंभामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण विकसित करण्याची, नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्याची आणि महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली.





