
जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून जळगावकर ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने हैराण झाला आहे. यातून जळगावकरांना महिन्याच्या अखेरीस काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हा अंदाज असून प्रत्यक्ष पावसाची स्थिती हवामानातील बदलांवर अवलंबून राहणार आहे.
ऑक्टोबर हीटचा तडाखा; तापमान ३८ अंशांवर
जळगाव जिल्ह्यात यंदा सप्टेंबरच्या मध्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून, परतीच्या पावसानेही अपेक्षित हजेरी लावलेली नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दिवसा कडक ऊन आणि उकाडा जाणवत असताना, गेल्या काही दिवसांत रात्रीच्या तापमानात घट झाल्याने पहाटेच्या वेळी काहीसा गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री सुखद वातावरण, असे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण?
हवामानातील संभाव्य बदलांमुळे १७ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात काही काळ ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा प्रभाव राज्यातील हवामानावर पडत असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, २४ ऑक्टोबरच्या आसपास अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीचा प्रभाव कोकण, पुणे आणि नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्यास जळगाव जिल्ह्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
या तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज
संभाव्य अंदाजानुसार, २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान चाळीसगाव, पारोळा आणि पाचोरा तालुक्यांत तुलनेने अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.वाऱ्यांची दिशा आणि अरबी समुद्रातील हवामान प्रणालीची तीव्रता यानुसार पावसाचे क्षेत्र आणि जोर बदलू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष हवामानाच्या अंदाजाकडे
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबरअखेरीस पाऊस झाल्यास त्याचा शेतीवर काय परिणाम होणार, याबाबतही उत्सुकता आहे. मात्र, पावसाची वेळ, तीव्रता आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम असताना, दुसरीकडे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जळगाव जिल्ह्यातील हवामानात कोणते बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





