गुन्हेजळगाव जिल्हा

शेतातील विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतातील नादुरुस्त पाण्याची मोटार विहिरीतून बाहेर काढत असताना तोल गेल्याने विहिरीत पडून एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगर परिसरात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. विश्वनाथ भिका ताडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ ताडे हे गुरुवारी दुपारी आपल्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारी साधारण दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ते विहिरीतून नादुरुस्त झालेली पाण्याची मोटार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी अचानक त्यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले.

घटना लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने विश्वनाथ ताडे यांना विहिरीतून बाहेर काढून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली.

महिनाभरात कुटुंबातील तिसरा मृत्यू

विश्वनाथ ताडे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यापैकी एका मुलीचा विवाह झाला असून दुसरी मुलगी अविवाहित आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने ताडे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

या घटनेची सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच विश्वनाथ ताडे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या चुलत भावाचाही मृत्यू झाला होता. या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच विश्वनाथ ताडे यांचाही मृत्यू झाल्याने महिनाभराच्या कालावधीत कुटुंबातील तिसऱ्या व्यक्तीला गमावण्याची वेळ आली आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे ताडे परिवारासह शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button