जळगाव जिल्हापाचोरा

पाचोऱ्यात भुरट्या चोरांचा डाव! शेतकऱ्याचे २ लाख काही क्षणांत लांबविले, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोऱ्यात चोरट्यांनी एका वृद्ध शेतकऱ्याच्या दोन लाख रुपयांवर डल्ला मारला. ‘काका, तुमचे पैसे पडलेत’ असं म्हणत एका चोरट्याने लक्ष विचलित केलं, तर दुसऱ्याने दुचाकीच्या डिक्कीतून पैशांची पिशवी लंपास केली. पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावरील एका बँकेसमोर भरदिवसा हा प्रकार घडला असून चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील शेतकरी प्रकाश जिवराम पाटील हे शेतीकामासाठी पैशांची व्यवस्था करण्याकरिता पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावरील एका बँकेत गेले होते. त्यांनी बँकेतून दोन लाख रुपये काढले. त्यानंतर ही रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवण्यास सुरुवात केली.

याचवेळी परिसरात दबा धरून असलेल्या चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले. एका चोरट्याने जमिनीवर काही नोटा टाकून प्रकाश पाटील यांना, ‘काका, तुमचे पैसे पडलेत,’ असे सांगितले. आपलेच पैसे खाली पडल्याचे समजून पाटील नोटा उचलण्यासाठी खाली वाकले.

काही क्षणांत दोन लाखांची पिशवी गायब

प्रकाश पाटील यांचे लक्ष विचलित झाल्याची संधी साधत दुसऱ्या चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये असलेली पिशवी काढून घेतली. त्यानंतर दोन्ही चोरटे दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला.

शेतीकामासाठी उपयोगात येणारी रक्कम चोरीला गेल्याने प्रकाश पाटील यांचे नुकसान झाले आहे. बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या नागरिकांचे लक्ष विचलित करून चोरी करण्याची ही पद्धत चिंताजनक आहे. त्यामुळे बँकेतून पैसे काढल्यानंतर नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button