गुन्हेपारोळा

रस्ता ओलांडताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील सारवे गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिल्याची हृदयद्रावक घटना घडली. या भीषण अपघातात सारवे येथील दोन्ही १७ वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. जय मधुकर पाटील आणि चंद्रकांत रविराज पाटील अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे सारवे गावावर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी सायंकाळी जय पाटील आणि चंद्रकांत पाटील हे दोघे शेतात पशुधनाला चारा-पाणी देण्यासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून ते गावाकडे परतत होते. गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ ओलांडत असताना पारोळ्याकडून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की, दोन्ही तरुण काही अंतरावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.

या प्रकरणी युवराज भावसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

दरम्यान, अपघाताच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या सारवे ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button