
जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी आणि सध्या उत्राण (ता. एरंडोल) येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुण प्रेमविवाहित जोडप्याचा तापी नदीत मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, या जोडप्याचे पाय लोखंडी साखळीने एकत्र बांधून कुलूप लावलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह नदीत तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ माजली.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे ही घटना उघडकीस आली. श्याम हरी पाटील (वय २८) आणि त्याची पत्नी सपना (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम पाटील हा मूळचा अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील रहिवासी होता. तो सध्या पत्नी सपनासह एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे राहत होता. गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास नरडाणा येथील तापी नदीत दोघांचे मृतदेह तरंगताना आढळले. याबाबत माहिती मिळताच नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांच्या पथकाने दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. यावेळी श्यामचा डावा पाय आणि सपनाचा उजवा पाय लोखंडी साखळीने एकमेकांना बांधलेला होता. या साखळीला मोठे कुलूप लावलेले असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.
प्रेमविवाहानंतर संसाराला सुरुवात
श्याम पाटील आणि त्याचे कुटुंब काही वर्षांपूर्वी कामानिमित्त पाडळसरे गाव सोडून उत्राण येथे गेले होते. श्याम शेतीची कामे तसेच ट्रॅक्टर चालवून उदरनिर्वाह करत होता. उत्राण येथे बहिणीकडे राहणाऱ्या सपनाशी त्याची ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी मे महिन्यात प्रेमविवाह केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपूर्वी हे जोडपे बाहेरगावी गेले होते. त्यानंतर गुरुवारी दोघांचे मृतदेह तापी नदीत आढळून आल्याने त्यांच्या मृत्यूबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
आत्महत्या की घातपात? तपासाकडे लक्ष
पती-पत्नीचे पाय लोखंडी साखळीने बांधलेले आणि त्याला कुलूप लावलेले असल्याने या घटनेचे गूढ अधिक वाढले आहे. दोघांनी आत्महत्या केली की या प्रकरणामागे अन्य काही कारण आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासातूनच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे.या घटनेमुळे पाडळसरे, उत्राण आणि नरडाणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्यामच्या पश्चात त्याची आई आणि लहान भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे.





