
आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, टूल-डाय निर्मिती व अचूक अभियांत्रिकीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडो-जर्मन टूल रूम (आयजीटीआर), छत्रपती संभाजीनगर येथे औद्योगिक भेट दिली.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, टूल व डाय तंत्रज्ञान, अचूक अभियांत्रिकी, उत्पादन प्रक्रिया आणि आधुनिक औद्योगिक कार्यपद्धतींची प्रत्यक्ष माहिती घेतली.

औद्योगिक साधने व घटकांची रचना, विकास आणि निर्मितीची प्रक्रिया तसेच अभियांत्रिकीच्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात होणारा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. आयजीटीआर मधील विविध तांत्रिक सुविधा आणि प्रशिक्षण प्रक्रियेची माहिती या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन विकसित होण्यास तसेच भविष्यातील करिअरसाठी आवश्यक औद्योगिक ज्ञान मिळण्यास मदत झाली.
ही औद्योगिक भेट प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डीन अकॅडमिक्स तथा यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. तुषार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. यावेळी डॉ. पंकज बोंडे, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. भालचंद्र सुरवाडे आणि प्रा. खुशाली बेलदार यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभागी होत भेटीच्या नियोजनासाठी योगदान दिले. उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.





