जळगाव शहर

अनाथ मुलींचे माहेरपण जपणारी दीपस्तंभाची हृद्य संकल्पना; खासदार विनोद तावडे

दीपस्तंभ फाऊंडेशनचा ‘माहेर मेळावा’; १४७ माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव लाईव्ह न्यूज । दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि स्वावलंबनाची संधी देऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या दीपस्तंभ फाऊंडेशन – मनोबल, जळगाव येथे नुकताच ‘माहेर मेळावा व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यासाठी 147 दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर तसेच आर्थिक दृष्ट्या वंचित घटकातील इतर विद्यार्थी उपस्थित होते. हे सर्व विद्यार्थी आज प्रशासनातल्या विविध पदांवर तसेच खाजगी क्षेत्रात कार्यरत आहेत.

समाजातील दिव्यांग, अनाथ आणि इतरही विद्यार्थी संस्थेमध्ये शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असतात. विशेषतः अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थिनींना विवाहानंतर आपलं घर म्हणून माहेरी येण्यासाठी “माहेर मेळावा” या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत दोन दिवस या सर्व मुली माहेरपणासाठी येतात. यावेळी त्यांच्यासाठी कपडे, मेहंदी, बांगड्या, विविध खेळ, झोके यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. संस्थेतल्या या सर्व मुली आपल्या परिवारासह या कार्यक्रमात सहभागी होतात.

या मेळाव्यास राज्यसभा खासदार विनोद तावडे आणि सौ. वर्षा तावडे हे दोघेही उपस्थित होते. विद्यार्थ्यांसोबत सहभागी होत त्यांनी ‘सुंदर आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा मूलमंत्र’ दिला. या वेळी बोलताना ते म्हणाले, “भांड्याला गंज चढल्यावर त्याची कल्हई केली जाते. पण मनाला गंज चढतो, तेव्हा मनोबलमध्ये येऊन सेवा दिली पाहिजे. तेव्हाच आपण मनाची सफाई करू शकतो. दीपस्तंभ हे जसे तुमचे माहेर आहे, तसेच हे माहेर तुम्ही जिथे कार्यरत आहात, तिथेही पोहोचवले पाहिजे.”

मेळाव्याच्या पहिल्या दिवशी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व त्यांच्या पत्नी सौ. सानिका धिवरे यांचीही उपस्थिती लाभली. “सर्वसमावेशक समाज कसा असावा? याचे उत्तम उदाहरण येथे प्रत्यक्ष अनुभवता येते आणि इथून नवी ऊर्जा मिळते,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या दोन दिवसीय मेळाव्यादरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी संस्थेला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे , खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल जावळे, अमोल शिंदे यांचा समावेश होता. माहेर मेळाव्यात सहभागी विद्यार्थिनींसाठी पारंपारिक मंगळागौरीचे विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, संवादसत्रे आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले.

ट्रान्सजेंडर विद्यार्थिनी विजया वसावे आज महाराष्ट्रातील पहिली ‘ट्रान्सजेंडर वनरक्षक’ म्हणून कार्यरत आहे. तिने भावना व्यक्त करताना सांगितले, “मनोबलमुळे मी आज पहिल्यांदा माहेर अनुभवले आहे.” तसेच अनाथ विद्यार्थिनी विजया तोडकर हिनेही आपले मनोगत मांडले. “रक्ताची नाती नसताना इथे आल्यावर जो परिवार मिळाला आणि जे माहेर अनुभवते आहे, त्याची सर कशालाच नाही,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी प्रसिद्ध ज्येष्ठ कार्डियाक ॲनेस्थेटिस्ट मा. अलका मांडके, मा. हेमाताई अमळकर, मा. रश्मी भातखळकर, आणि मा. राजू नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मा. गणेश शिंदे व सौ. सन्मिता शिंदे यांचा ‘गाव सुटेना’ हा कार्यक्रम या मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरला. आपल्या सादरीकरणातून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली आणि हास्य, मनोरंजन व भावनांचा सुरेख मिलाफ साधला.

मेळाव्यात मा. यजुर्वेंद्र महाजन, वर्षा तावडे, क्रांती पाटील (जॉईंट सेक्रेटरी मंत्रालय ) आणि गीता चव्हाण (DCP) यांची मार्गदर्शनपर सत्रे झाली. व्यक्तिमत्त्व विकासासोबतच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या सत्रांतून मिळाली.

दोन्ही हात नसतानाही माजी विद्यार्थिनीने केले औक्षण

विनोद तावडे व सौ. वर्षा तावडे यांचे औक्षण येथील माजी दिव्यांग विद्यार्थिनी माऊली अडकूर हिने केले. ती सध्या सोलापूर महानगरपालिकेत क्लर्क या पदावर कार्यरत आहे. दोन्ही हात नसतानाही जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर आयुष्याची वाटचाल करणाऱ्या माऊलीने केलेले हे औक्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरले. शारीरिक मर्यादा नव्हे, तर आत्मविश्वास आणि जिद्द हीच खरी ताकद आहे, याचा प्रत्यय या प्रसंगातून सर्वांना आला.

आर्यन इको रिसॉर्टवर विविध खेळ सांस्कृतिक कार्यक्रम व निसर्ग सहलीचा सर्वांनी आनंद घेतला. या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ संस्था ही केवळ शिक्षण देणारी जागा नसून एक माहेर, एक कुटुंब आणि आयुष्यभर सोबत राहणारा भावनिक आधार आहे, याची प्रचिती या दोन दिवसीय मेळाव्याने पुन्हा एकदा दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button