
जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट व लेखक डॉ. जानकीराम तळेले लिखित ‘होमिओपॅथी सायंटिफिक केस स्टडीज विथ मटेरिया मेडिका’ या पुस्तकाच्या व्हॉल्यूम १ व २चे प्रकाशन तसेच विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल केस स्टडीजच्या सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि लेखक डॉ. जानकीराम तळेले यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संचालक डॉ. एन. एस. अर्विकार, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. किरण भिरूड, डॉ. थेपडे, प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद कोल्हे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आर. एम. पाटील, उद्योजक सुनील जैन यांच्यासह वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. जानकीराम तळेले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, होमिओपॅथीच्या अभ्यासात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष रुग्णांच्या केस स्टडीजचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णाच्या केसकडे चिकित्सक आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घेतली पाहिजे. मटेरिया मेडिकाचा सखोल अभ्यास आणि क्लिनिकल अनुभव यांची सांगड घातल्यास होमिओपॅथीच्या ज्ञानाला व्यापक दिशा मिळू शकते.कार्यक्रमात दिपेश सोनवणे, आकाश गायकवाड, साक्षी औलगले (पाटील), निदा खान आणि अबिना किदवाई यांनी विविध क्लिनिकल केस स्टडीजचे शास्त्रीय पद्धतीने सादरीकरण केले. त्यांनी केस हिस्ट्री, निदान प्रक्रिया, उपचारपद्धती आणि औषधांच्या निवडीबाबत माहिती मांडली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा चिकित्सक दृष्टिकोन व विषयातील अभ्यास अधोरेखित झाला.
असा आहे लेखकाचा परिचय —
४० वर्षांचा अनुभव पुस्तकाच्या रूपाने प्रकाशन — डॉ. जानकीराम तळेले हे जळगावमधील परिचित पॅथॉलॉजिस्ट असून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून ते होमिओपॅथी अभ्यास व प्रॅक्टिसशी जोडलेले आहेत. पॅथॉलॉजी क्षेत्रातील अनुभवासोबत होमिओपॅथीच्या अभ्यासाने प्रेरित होऊन त्यांनी या उपचारपद्धतीचा सखोल अभ्यास केला. विविध आजारांच्या रुग्णांच्या केस स्टडीज आणि दीर्घ वैद्यकीय अनुभवातून या दोन पुस्तकांची निर्मिती झाली आहे.सध्या डॉ. तळेले हे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभागात लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही पुस्तकांमधून होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांना तसेच या क्षेत्रात प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांना क्लिनिकल केस स्टडीज, मटेरिया मेडिका आणि उपचाराच्या दृष्टिकोनातून उपयुक्त मार्गदर्शन मिळते. केवळ छोट्या आजारांपुरती मर्यादित न राहता विविध गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांच्या संदर्भातील केस स्टडीजचा चिकित्सक अभ्यास या पुस्तकांमध्ये मांडण्यात आला आहे, त्यामुळे लेखकाच्या प्रदीर्घ अनुभवाची खोली आणि ज्ञानाची व्याप्ती जाणवते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय ज्ञानासोबत सादरीकरण कौशल्य, चिकित्सक विचारसरणी आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली. पुस्तक प्रकाशन आणि केस स्टडी सादरीकरणामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांना चालना मिळाली.





