‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या कायदेविषयक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

सप्टेंबर 27, 2026 7:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । कायद्याची माहिती अभावी समाजातील कोणताही घटक अन्यायाचा बळी ठरू नये आणि प्रत्येकाला त्याच्या हक्कांची योग्य माहिती मिळावी, यासाठी ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे रविवारी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. समता नगरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर पार पडलेल्या या शिबीराचा जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या सुमारे ६०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

Aniketnikam camp

फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर पार पडले. रोजच्या व्यवहारात उद्भवणारे कौटुंबिक वाद, पती-पत्नीमधील तंटे, जमीन-मालमत्ता व ७/१२ उताऱ्यावरील अडचणी तसेच शेतीविषयक वादांवर तज्ज्ञ वकिलांच्या टीमने नागरिकांना मोफत व सोप्या भाषेत कायदेशीर मार्ग दाखवला.

याशिवाय सध्या वाढणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन पैशांची फसवणूक, प्रॉव्हिडंट फंड, नोकरीविषयक बाबी, पोलीस स्टेशनमधील तक्रारी, एफआयआर, कोर्टात तुंबलेली प्रकरणे आणि चेक बाउंसच्या केसेसवरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले. महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार आणि शासनाच्या मोफत न्याय योजनांची माहिती उपस्थितांना देवून योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

ॲड. अनिकेत निकम म्हणाले की, फाऊंडेशनतर्फे आधी चार शिबिर घेण्यात आले होते, आजचे पाचवे शिबिर होते. आम्ही आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांना मोफत मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, केवळ जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून नागरिक जळगावमध्ये होणाऱ्या शिबिरांना येत आहेत, हे आमच्यावरील विश्वासाचे प्रतिक आहे. कायद्याचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, हाच आपल्या फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे.

यावेळी सौ उज्वलाताई बेंडाळे, नितीन बर्डे, अनिल अडकमोल, सौ वैशालीताई अमित पाटील, नितीन सपके, राहुल वाघ, रितेश निकम, डी एन तिवारी, सचिन अडकमोल, भीमराव साळुंखे, आनंदराव गायकवाडयांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now