जळगाव लाईव्ह न्यूज । पत्नीकडून सतत होणारी पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी एका सालदाराने अत्यंत क्रूर पाऊल उचलत ज्या घरात तो काम करीत होता, त्याच ७२ वर्षीय मालकिणीचा बेल्टने गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना रावेर तालुक्यातील दोधे येथे घडली. घटनेनंतर काही तासांत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. खून केल्यानंतर संशयिताने वृद्धेच्या अंगावरील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.

ललिताबाई वसंत पाटील असे खून झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव असून, त्या निवृत्त पोलिस पाटील वसंत दयाराम पाटील यांच्या पत्नी होत. तर लाला धर्मा रावत (१९, रा. दोधे, ता. रावेर) असे जेरबंद करण्यात आलेल्या संशयित सालदाराचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत ललिताबाई यांचे पती वसंत पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. घरी ललिताबाई एकट्याच असल्याची खात्री केल्यानंतर, त्यांच्याकडे सालदार म्हणून काम करणाऱ्या लाला धर्मा रावत याने संधी साधली.
पत्नीच्या हट्टापायी लाला याला पैशांची तीव्र गरज होती. ३० हजार रुपयांसाठी त्याची पत्नी माहेरी सीतापूर (रायगड) येथे निघून गेली होती. तिला पैसे पाठवून पुन्हा घरी आणण्यासाठीच त्याने हा भयानक कट रचला. दुपारी ४ वाजता त्याने एकट्या असलेल्या ललिताबाई यांच्यावर बेल्टने हल्ला करत गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील व कानातील मिळून साडेतीन तोळे वजनाचा ऐवज जबरदस्तीने काढून पसार झाला.
पोलिसांकडून वेगाने तपास आणि कबुली
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि संशयित लाला धर्मा रावत याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या पत्नीला आणण्यासाठी पैसे हवे असल्यामुळेच वृद्ध मालकिणीचा खून करून दागिने लांबवल्याची कबुली दिली आहे. या भीषण घटनेमुळे दोधे गावात आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. रावेर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.








