आमदार राजूमामा भोळेंकडून जळगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील अनेक भागांत गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, मका आणि उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत आमदार सुरेश भोळे यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.

दरम्यान, जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी तसेच पिकांच्या नुकसानीबाबत आमदार भोळे यांच्याकडे व्यथा मांडल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी आमदारांनी दिली.






