गणेश विसर्जन मिरवणुकीत जळगाव पोलिसांचा ‘हायटेक’ बंदोबस्त; ड्रोन, दामिनी अन् सोशल मीडिया सेल सज्ज

सप्टेंबर 22, 2026 12:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. मिरवणुकीवर दोन ड्रोनद्वारे सतत देखरेख ठेवण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी चेन स्नॅचिंग स्क्वाड, दामिनी पथक, बीडीडीएस आणि सोशल मीडिया सेलसह विविध पथके तैनात करण्यात येणार आहेत.

ganeshvisarjan police

गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे नियोजन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करण्यासाठी प्रत्येक मंडळाला क्रमांक देण्यात येणार आहे. संबंधित मंडळाला मिरवणुकीत सोडण्याचा क्रमांक कोर्ट चौकातील मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे मंडळांना आपला क्रम स्पष्टपणे समजण्यास मदत होणार आहे.

मिरवणूक मार्गावर बॅरिकेडिंग, PA सिस्टम

टॉवर चौक ते नेहरू चौक या संपूर्ण मिरवणूक मार्गावर PA System बसविण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिक आणि गणेश मंडळांना आवश्यक सूचना तात्काळ देण्यात येतील. तसेच मिरवणूक मार्गावरील आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे.

ट्रॅक्टर चालकांची Breath Analyser तपासणी

गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या प्रत्येक ट्रॅक्टर चालकाची Breath Analyser द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे प्रकार रोखण्यासाठी ही तपासणी केली जाणार आहे.

महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष Chain Snatching Squad तैनात करण्यात येणार असून, महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाचाही बंदोबस्तात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय बीडीडीएस पथकामार्फत मिरवणूक मार्गावर रोड चेकिंग करण्यात येणार आहे.

सोशल मीडिया पेट्रोलिंगवरही भर

मिरवणुकीदरम्यान सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मीडिया सेलमार्फत प्रभावी पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. अफवा किंवा आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्टमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून सोशल मीडिया मॉनिटरिंगवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

SRPF, होमगार्ड आणि RCPचा बंदोबस्तात सहभाग

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी SRPF कंपनी, होमगार्ड आणि RCP यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. तसेच DSB, LCB, कंट्रोल, वेल्फेअर, सायबर आणि रीडर ब्रांच यांसारख्या नॉन-एक्झिक्युटिव्ह शाखांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही स्ट्राइकिंग फोर्स म्हणून बंदोबस्तात सहभागी करून घेण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गुड मॉर्निंग स्क्वाडकडून धार्मिक स्थळे आणि पुतळ्यांची नियमित पाहणी करण्यात येत आहे. यासोबतच सेवाभावी संघटना आणि निवृत्त पोलिसांचाही बंदोबस्तासाठी सहभाग घेण्यात येणार आहे.

उत्कृष्ट मंडळांना ‘गणराया पुरस्कार’

गणेशोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गणराया पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. यामुळे गणेश मंडळांना सामाजिक उपक्रम, शिस्त आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

दरम्यान, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना जागेवरच फूड पॅकेटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे मिरवणुकीदरम्यान दीर्घकाळ ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचीही आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच, गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तंत्रज्ञानासह विविध पथकांचा वापर करून व्यापक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now