जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे पावसाळा सुरू असतानाही जळगावकरांना सध्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सप्टेंबर महिन्यातच तापमानाने चांगलीच उसळी घेतली असून, ऑक्टोबरमध्ये जाणवणारी उष्णता आतापासूनच जाणवू लागली आहे. गेल्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यातच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने नागरिकांना प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत आहे.

पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ते २२ सप्टेंबरनंतर जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी एक-दोन दिवस पावसाच्या सरी कोसळू शकतात. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत.

गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर जळगावच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी चार दिवसांत कमाल तापमान ३५ अंशांचा टप्पा ओलांडून ३६ ते ३७ अंशांपर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे उकाड्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन
सध्या जळगावकरांना दिवसभरात हवामानाचे वेगवेगळे ऋतू अनुभवायला मिळत आहेत. सकाळच्या वेळी वातावरणात आर्द्रता आणि बाष्पाचे प्रमाण वाढल्याने काही भागांत धुकेसदृश वातावरण जाणवते. मात्र, सूर्य वर येताच परिस्थिती बदलते आणि कडक उन्हासह उकाडा वाढतो.
दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक घामाघूम होत असून, काही वेळा वातावरणात अचानक गारवा जाणवत आहे. पावसाच्या सरी आणि ढगाळ वातावरणाचा फारसा प्रभाव नसल्याने सध्या सप्टेंबरमध्येच जळगावकरांना ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. आगामी काही दिवसांत तापमानात होणारी वाढ आणि परतीच्या पावसाची शक्यता यामुळे जळगावच्या हवामानात पुन्हा मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.







