जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर पाचव्या मार्गिकेच्या कामांतर्गत ‘यार्ड रिमॉडेलिंग’ हाती घेण्यात आले असून यामुळे आज १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, एकूण १२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन गणेशोत्सवाचा काळ सुरू असतानाच रेल्वे गाड्या रद्द झाल्याने जळगावसह परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

१९ सप्टेंबरला दोन एक्स्प्रेस उशिराने
शनिवार, १९ सप्टेंबर रोजी दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. १९०४६ थावे–सुरत एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे, तर १२३३५ भागलपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास ३५ मिनिटे उशिराने धावणार आहे.

२३ सप्टेंबरला पाच गाड्या रद्द
बुधवार, २३ सप्टेंबर रोजी पाच गाड्यांचे संचालन रद्द करण्यात आले आहे. यामध्ये १९००७ सुरत–भुसावळ एक्स्प्रेस, १९१०५ उधना–भुसावळ एक्स्प्रेस, १९१०६ भुसावळ–उधना एक्स्प्रेस, ११११४ भुसावळ–देवळाली मेमू आणि ६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमू यांचा समावेश आहे.
२४ सप्टेंबरला सात गाड्या रद्द
गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी आणखी सात गाड्या रद्द राहणार आहेत. १९००८ भुसावळ–सुरत एक्स्प्रेस, ५९०७५ नंदुरबार–भुसावळ पॅसेंजर, ५९०७६ भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर, ११११९ इगतपुरी–भुसावळ मेमू, १११२० भुसावळ–इगतपुरी मेमू, ११११३ देवळाली–भुसावळ मेमू आणि ६११२९ नाशिक–बडनेरा मेमू या गाड्यांचा त्यात समावेश आहे.
पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसही उशिराने
२४ सप्टेंबर रोजी काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे, १२१०४ लखनौ–पुणे एक्स्प्रेस १ तास ३५ मिनिटे आणि १५०१८ गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
तसेच १९०४६ थावे–सुरत एक्स्प्रेस १ तास ५ मिनिटे, तर १५६४८ गुवाहाटी–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास २५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा
जळगाव-भुसावळ पाचव्या मार्गिकेच्या कामासाठी यार्ड रिमॉडेलिंग अत्यावश्यक असून, त्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत. या कामामुळे रेल्वे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे १९, २३ आणि २४ सप्टेंबर रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या गाडीचे संचालन आणि सुधारित वेळ तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केले आहे. कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे.






