जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी असलेल्या जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. समीर जानमोहम्मद तडवी (वय ३०, रा. अकलूद, ता. यावल) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव असून या कारवाईत पोलिसांनी चार गुन्ह्यांची उकल करत आरोपीकडून ६५ लिटर डिझेल आणि ५० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरीच्या घटना समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिओ कंपनीच्या टॉवरवर पूर्वी काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान समीर तडवी हा सुमारे दोन वर्षांपूर्वी जिओ टॉवरवर डिझेल भरण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने त्याचा अकलूद येथे शोध घेतला. त्याला चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेत आणल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने जळगाव तालुक्यातील विविध टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यामध्ये खिर्डी शिवारातील जिओ टॉवरमधून २३० लिटर, कडगाव रस्त्याजवळील टॉवरमधून २३० लिटर, भादली रेल्वे गेटजवळील टॉवरमधून २२० लिटर, तर असोदा रोडवरील टॉवरमधून २४० लिटर डिझेल चोरी केल्याचे समोर आले आहे. चारही ठिकाणांहून मिळून ९२० लिटर डिझेल चोरीला गेले आहे.
नशिराबाद पोलिसांत चार गुन्हे दाखल
या प्रकरणात नशिराबाद पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून या चारही प्रकरणांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.या चारही गुन्ह्यांतील चोरीच्या मुद्देमालापैकी ६५ लिटर डिझेल आणि ५० हजार रुपये रोख आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउनि सोपान गोरे, पोउनि दीपक जगदाळे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.







