जळगाव जिल्हा पोलीस कर्मचारी पतपेढीची 105 वर्षांची गौरवशाली वाटचाल; वर्षभरात 2 कोटींचा नफा

सप्टेंबर 7, 2026 5:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतपेढी लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या 105 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

JJPM

जळगाव जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतपेढीची स्थापना 29 ऑगस्ट 1921 रोजी झाली. संस्थेने नुकतीच 105 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून 106व्या वर्षात पदार्पण केले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात संस्थेने तब्बल 2 कोटी 2 लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. संस्थेचा उद्देश केवळ नफा मिळविणे नसून सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावणे हा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सभासदांना आतापर्यंत 71 कोटी रुपयांचे जामीन कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी 9 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 88 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

याशिवाय सभासदांसाठी मोटारसायकल व वाहन कर्जाची सुविधाही 9 टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 87 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

संस्थेच्या या आर्थिक योजनांमुळे सभासदांना विविध गरजांसाठी आर्थिक आधार मिळत असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला तसेच कुटुंबाच्या प्रगतीलाही बळ मिळत आहे. त्यामुळे पतपेढीची आर्थिक कामगिरी ही केवळ नफ्यापुरती मर्यादित नसून सभासदांच्या जीवनातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.

सभासदांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक आधार मिळावा, यासाठी संस्थेने महत्त्वपूर्ण तरतूद केली आहे. सभासदांचा तीन वर्षांच्या कालावधीसाठी 5 लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. तसेच सभासदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास तात्काळ मदत म्हणून 10 हजार रुपयांचा मृत्यू निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now