गिरीश महाजन येताच रक्षा खडसे बैठकीतून बाहेर! भाजपमधील अंतर्गत वादाच्या चर्चांना उधाण

सप्टेंबर 7, 2026 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भाजपच्या जळगाव जिल्हा बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा बैठकीसाठी रक्षा खडसे उपस्थित असताना गिरीश महाजन बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच रक्षा खडसे बैठकीतून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली.

raksha khadse girish mahajan

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रक्षा खडसे यांची उद्या दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आहे. त्यासाठी त्यांना दिल्लीला रवाना व्हायचे असून, त्यांचे विमान सायंकाळी सात वाजता असल्याने त्या बैठकीतून एक तास आधीच बाहेर पडल्या. तसेच त्यांनी याबाबत आपल्याला माहिती दिली होती, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

‘पक्षात कोणताही वाद नाही’

रक्षा खडसे यांच्या बैठकीतून बाहेर पडण्यामागे कोणताही राजकीय वाद नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. पक्षामध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही. त्यांच्या घरचा कोणता विषय असेल, तो वेगळा विषय आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या घटनेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील अनेक बडे नेते उपस्थित होते. मात्र, निमंत्रण असूनही भाजपमधील प्रमुख नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे रक्षा खडसे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now