जळगाव लाईव्ह न्यूज । दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील रेल्वे ट्रॅकवरून कोळसा चोरी करणाऱ्या टोळीचा भुसावळ तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल आठ आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून कोळसा चोरीसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना १ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारास दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील रेल्वे ओव्हरब्रिजजवळ घडली. रेल्वे ट्रॅकवरील कोळसा काही जण चोरी करून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याची माहिती केंद्रातील सुरक्षा अधिकारी सोमेश्वर मधुकर जाधव यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी सुमारे सात ते आठ जण रेल्वे ट्रॅकवरून कोळसा चोरी करून ट्रॅक्टरमध्ये भरताना आढळून आले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना हटकून नाव-पत्ता विचारला असता शेखर चंद्रकांत बावस्कर, धिरज संजय सोनवणे, मुकेश अरुण सोनवणे, जितेंद्र संजय शिंदे, मोहित किरण पाटील आणि विजय जगदीश पावरी, सर्व रा. फुलगाव, ता. भुसावळ, अशी सहा जणांची नावे समोर आली.
दरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर कोळशाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्या दोन अनोळखी आरोपींची ओळख पटवली. तपासात ते रोहित किरण सोनवणे आणि सागर रविंद्र कोळी, दोघेही रा. फुलगाव असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील सर्व आठ आरोपींना अटक केली. न्यायालयाकडून २ सप्टेंबर ते ४ सप्टेंबरदरम्यान आरोपींची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. तपासादरम्यान कोळसा चोरीसाठी वापरण्यात आलेले एमएच १९ सीझेड ३८७३ क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि एमएच १९ एएन ६५८४ क्रमांकाची ट्रॉली, असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय चोरी केलेला पाच टन कोळसा, अंदाजे २० हजार रुपये किमतीचा, पोलिसांनी हस्तगत केला. त्यामुळे या कारवाईत एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हेमंत मिटकरी यांनी केला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, सहा. फौज, संजय तायडे, पोहेकों योगश पालवे, पोना हेमंत मिटकरी, पोकों जितेंद्र ठाकरे, पोकों किरण तायडे, पोकों मुकेश मेढे, पोकों सुभाष सोनवणे, पोहेकॉ कैलास बाविस्कर यांनी कार्यवाही केली आहे.









