जळगावात स्पाच्या नावाखाली देहव्यापाराचा पर्दाफाश; ६ तरुणींची सुटका

सप्टेंबर 2, 2026 9:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एका नामांकित स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अवैध देहव्यापाराचा जळगाव पोलिसांच्या दामिनी पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत स्पा सेंटरमधून ६ तरुणींची सुटका करण्यात आली असूनजिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spa

जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही दिवस स्पावर पाळत ठेवून माहितीची खातरजमा केली. तसेच डमी ग्राहक पाठवून स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी गैरप्रकाराचे चित्रीकरण करून पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला.

या कारवाईत स्पा सेंटरमधून ६ तरुणींची सुटका करण्यात आली. यामध्ये पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, मणिपूरमधील तामेंगलोंग, पूर्व सिक्कीम तसेच नेपाळमधील बांके येथील तरुणींचा समावेश आहे. या सर्व तरुणी स्पामध्ये मसाज थेरपिस्ट म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये नेपाळमधील एका तरुणीचाही समावेश असल्याने पोलिसांनी तिच्या पासपोर्ट, व्हिसा तसेच भारतात प्रवेश करण्याच्या वैधतेबाबत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात नीरज सिंग पंड्या (रा. मुखर्जी नगर, रतलाम, मध्य प्रदेश) हा स्पाचा चालक व परवानाधारक, तर राजेंद्र पुंडलिकराव चव्हाण (रा. यशवंत कॉलनी, रिंग रोड, जळगाव) हा जागा मालक व परवानादाता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दामिनी पथकाच्या या कारवाईमुळे मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या कथित गैरप्रकाराला मोठा धक्का बसला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कारवाईत सहभागी पोलीस पथक

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली. दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार वैशाली किशोर माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनु उत्तम घुले, अंजली नवलसिंग राजपूत, रीना महाजन, आरसीपी जवान ज्ञानेश्वर विठ्ठल पाटील आणि अतीन संतोष थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईत जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, प्रोबेशनरी DySP सह्याद्री बिर्ले, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे API अनिल वाघ, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) API माधुरी बोरसे, PSI दिनेश बडगुजर, PSI राजेश पाटील, ASI अनिल पाटील आणि ASI भूषण कोल्हे यांच्यासह पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
अंमलदारांमध्ये पोलीस हवालदार दीपक पाटील, किरण धनगर, मनीषा पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल राखी खाटिक, HC महेश महाजन, LHC अनिता वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत लाड, समाधान पाटील आणि प्रवीण जाधव यांचा समावेश होता. या प्रकरणाचा सखोल तपास जिल्हा पेठ पोलीस ठाण्याकडून सुरू आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now