जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

ऑगस्ट 29, 2026 6:24 PM

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

जळगाव लाईव्ह न्यूज । खेळ आपल्याला फक्त जिंकायला शिकवत नाही, तर शिस्त, मेहनत, संयम, संघभावना आणि पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. जळगावच्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि जिद्द आहे. त्यांना योग्य सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. स्वयंसेवी संस्था आणि समाजाचीही खेळाडूंना मोलाची साथ आहे. या सर्वांच्या पाठबळावर जिल्ह्यातील खेळाडूंनी केवळ जिल्ह्याच्या मैदानापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रासाठी, देशासाठी खेळावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून जळगावचे नाव मोठे करावे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केले.

kridaday

येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील सभागृहात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार सुरेश भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, नगरसेवक नीलेश तायडे, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, जळगावच्या खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात सुमारे २५० कोटी रुपयांच्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातही खेळाडूंसाठी विविध सुविधा मंजूर करण्यात आल्या आहेत. या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून खेळाडूंनी कठोर मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगावचे नाव मोठे करावे. मैदानावर विजय मिळवतानाच प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करावा आणि खिलाडूवृत्ती कायम जपावी. खेळ आनंदासाठी खेळा, विजयासाठी मेहनत करा आणि देशाचा अभिमान वाढवण्यासाठी जिंका, असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

उपस्थितांना प्रत्येकी एक झाडाचे रोप देऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. दोन वर्षांनंतर हे रोपटे सुदृढ व सुंदर पद्धतीने वाढविणाऱ्या व्यक्तीस पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी दिली. सूत्रसंचालन सुरेश धरपुडे व सचिन निकम यांनी केले, तर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दिघे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला पालक, क्रीडाप्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now