जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळमार्गे कोकण, गोवाकडे धावणारी आणखी एक विशेष गाडी नियमितपणे उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने जबलपूर–कोयंबतूर दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेचे नियमित मेल/एक्सप्रेस सेवेत रूपांतर केले आहे. विशेष म्हणजे भुसावळ स्थानकावर या गाडीला थांबा असल्याने खानदेशातील प्रवाशांची सोय होणार आहे.

सध्या ०२१९८/०२१९७ क्रमांकाने ही गाडी विशेष सेवा म्हणून धावत आहे. आता नियमित सेवेसाठी तिला २०१६० आणि २०१५९ असे नवीन क्रमांक देण्यात आले आहेत.

२३ ऑक्टोबरपासून नियमित सेवा
गाडी क्रमांक २०१६० जबलपूर–कोयंबतूर साप्ताहिक एक्सप्रेस २३ ऑक्टोबर २०२६ पासून दर शुक्रवारी रात्री ११.५० वाजता जबलपूरहून रवाना होईल. ही गाडी रविवारी दुपारी २.३० वाजता कोयंबतूरला पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात २०१५९ कोयंबतूर–जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस २६ ऑक्टोबरपासून दर सोमवारी सायंकाळी ५.०५ वाजता कोयंबतूरहून सुटेल आणि बुधवारी सकाळी ८.४५ वाजता जबलपूरला पोहोचेल.
भुसावळसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा
जबलपूर ते कोयंबतूरदरम्यान या गाडीला अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा आणि भुसावळ या स्थानकांनंतर गाडी नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम आणि मडगाव, कारवार, कुमटा, मूकाम्बिका रोड-बिंदूर, कुंदापूर, उडुपी, मुलकी, मंगळुरू, कासारगोड, कन्नूर, वडकारा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पलक्कड़ या स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे.
मध्य प्रदेशापासून पश्चिम किनारपट्टीमार्गे दक्षिण भारताला जोडणारी ही रेल्वे सेवा नियमित झाल्याने भुसावळसह खानदेशातील प्रवाशांना कर्नाटक, गोवा, केरळ आणि तामिळनाडूकडे जाण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.








