जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आहे. निधीअभावी प्रलंबित असलेल्या या पुलासाठी शासनाने ४५ कोटी ८२ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित काम पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २०२० मध्ये या पुलासाठी २५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, निधी अपुरा पडल्याने सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम रखडले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शासनाने या प्रकल्पाच्या ४५ कोटी ८२ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पूर्वीच्या मंजूर निधीच्या तुलनेत २० कोटी ८२ लाख रुपयांच्या वाढीव खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानुसार १९ ऑगस्ट रोजी संबंधित विभागाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले.
निधीची अडचण दूर झाल्याने आता पुलाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. म्हसावद रेल्वे उड्डाणपूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.









