डांभुर्णीत हवेत गोळीबार करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गावठी पिस्तुलासह काडतूस जप्त

ऑगस्ट 28, 2026 1:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत आरोपीला जळगावातून ताब्यात घेतले. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

dambhurni Golibar

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता डांभुर्णी गावातील चौकात विकास सोळंके याने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धारबळे यांच्यासह पोउनि मैनुद्दीन सय्यद, पोहेकॉ रोहिल गणेश, पोकॉ अनिल साळुंखे आणि पोकॉ हितेश बागुल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळाची पाहणी केली असता किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ नुकतेच फायर केलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी पोलिसांना आढळून आली. परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता विकास सोळंके यानेच तेथे गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करून रिकामी पुंगळी तसेच इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.

गोळीबार केल्यानंतर आरोपी जळगावच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोउनि अनिल महाजन आणि पोकॉ सचिन पाटील यांना आरोपीच्या शोधासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे यांच्या पथकानेही शोधमोहीमेत सहभाग घेतला. पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध घेत रात्री सुमारे १ वाजता कालंका माता मंदिर परिसरातून विकास उर्फ गोटू सोळंके याला ताब्यात घेतले. त्याला यावल पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणांवर दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार?

पोलिसांच्या तपासात आरोपीचे कोळन्हावी परिसरात हॉटेल, बीअर बार आणि परमिट रूम असल्याचे समोर आले आहे. डांभुर्णी गावातील काही तरुण त्याच्या हॉटेलमध्ये येऊन मोबाईलवर व्हिडीओ काढून त्रास देत असल्याचे आरोपीने चौकशीत सांगितल्याची माहिती आहे. २६ ऑगस्ट रोजी या तरुणांसोबत आरोपीचे भांडण झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या दिवशी डांभुर्णी येथे जाऊन हवेत गोळीबार केल्याचे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेतात लपवलेले पिस्तूल पोलिसांनी केले जप्त

गोळीबारासाठी वापरलेले हत्यार कोळन्हावी गावाच्या शिवारात असलेल्या स्वतःच्या मालकीच्या आदर्श हॉटेलजवळील शेतात लपवून ठेवल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोउनि मैनुद्दीन सय्यद, पोउनि अनिल महाजन, सफौ हेमंत सांगळे, पोहेकॉ/3070 रोहिल गणेश, पोका/226 हितेश बागुल, पोकॉ/01 सचिन पाटील, पोकॉ/1803 अनिल साळुंखे, चालक पोकॉ संतोष पाटील यांनी केलेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now