
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ मार्गे प्रयागराज -मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मध्य रेल्वेने मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज विशेष गाडी क्रमांक 04151/04152 नियमित केली आहे. ही गाडी आता अमृत भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक 20435/20436 म्हणून धावेल. या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने जळगावसह संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून पर्यटक आणि भाविकांसाठी मध्य प्रदेशातील निसर्गरम्य स्थळांसह उत्तर प्रदेशातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट देणे आता अधिक सोयीचे होणार आहे.

मध्य रेल्वेनुसार, ही गाडी साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस म्हणून धावेल. गाडी क्रमांक 20435 एलटीटी-प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस 22 ऑगस्ट 2026 पासून दर शनिवारी सायंकाळी 5:20 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:40 वाजता प्रयागराजला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक २०४३६ प्रयागराज-एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस २१ ऑगस्ट २०२६ पासून दर शुक्रवारी सायंकाळी ६:१० वाजता प्रयागराजहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३:४५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
या सुपरफास्ट ट्रेनला लक्षणीयरीत्या कमी थांबे असतील. ही ट्रेन कल्याण, भुसावळ, इटारसी, जबलपूर आणि सतना स्थानकांवर थांबेल. ट्रेनमध्ये एकूण २२ अमृत भारत डबे असतील. यामध्ये ११ जनरल अनारक्षित डबे, ८ स्लीपर डबे, १ पॅन्ट्री कार आणि २ सामान-सह-दिव्यांग ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे.
या गाडीला भुसावळ येथे थांबा मिळाल्याने जळगाव, धुळे, नंदुरबारसह खान्देशातील प्रवाशांना प्रयागराज, काशी, अयोध्या तसेच मध्य प्रदेशातील पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी ही रेल्वेसेवा उपयुक्त ठरणार आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना सविस्तर वेळा आणि थांब्यांसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याची किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करण्याची विनंती केली आहे. तिकीट बुकिंगसाठी रेलवन (RailOne) ॲपचा वापर करता येईल.






