लग्नासाठी RPFची वर्दी घातली अन् जळगाव स्टेशनवर बिंग फुटलं; तोतया महिला पोलिसाचा पर्दाफाश

ऑगस्ट 20, 2026 5:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफची वर्दी घालून फिरणाऱ्या तोतया महिला पोलिसाचा बनाव आरपीएफच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणीची चौकशी केली असता तिने आपण नाशिक आरपीएफमध्ये कार्यरत असल्याचा दावा केला. मात्र, ओळखपत्र मागितल्यानंतर तिच्या दाव्याची पोलखोल झाली.

totayapolice

तपासणीदरम्यान संबंधित तरुणीकडे आरपीएफचे ओळखपत्र आढळून आले नाही. त्यामुळे आरपीएफ जवानांनी नाशिक आरपीएफशी संपर्क साधून तिच्याबाबत माहिती घेतली. त्यावेळी ती आरपीएफमध्ये कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिची अधिक चौकशी केली असता ती जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवासी असल्याचे समोर आले.

लग्नासाठी पोलीस वर्दीचा वापर

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. लग्नासाठी संभाव्य स्थळांवर आपला प्रभाव पाडण्यासाठी तिने पोलीस वर्दीचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर यापूर्वी तिने महाराष्ट्र पोलिसांच्या वर्दीत फोटो काढल्याचेही आढळून आले आहे.

तिच्याकडून काही बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित तरुणीने पोलीस वर्दीचा वापर नेमका कोणत्या उद्देशाने केला होता, याचा तपास सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सुरक्षा तपासणीमुळे या तोतया पोलिसाचा बनाव उघडकीस आल्याने रेल्वे सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेचेही कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now