गुन्हेजामनेर

दारू-जेवण न दिल्याने जामनेरातील हॉटेलमध्ये राडा; तिघांकडून तोडफोड अन् मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील टाकळी रस्त्यावर असलेल्या आर्यन हॉटेलमध्ये दारू आणि जेवण न दिल्याच्या कारणावरून मध्यरात्री राडा झाल्याची घटना घडली. तिघांनी हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉटेलची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

तक्रारीनुसार, कल्पेश माळी, मयूर शिवद आणि मनोहर राऊत (तिघे रा. जामनेर) हे हॉटेलमध्ये आले होते. दारू आणि जेवण न दिल्याच्या कारणावरून त्यांचा हॉटेल चालक व कर्मचाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये गोंधळ घालत दरवाजा आणि खिडकीची तोडफोड करून नुकसान केल्याचा आरोप आहे.

या घटनेदरम्यान राजू लखू पवार हा तरुण जखमी झाला. आरोपी कल्पेश माळी याने धारदार शस्त्राने राजू पवार यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागावर वार करून दुखापत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी कल्पेश माळी, मयूर शिवद आणि मनोहर राऊत यांच्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत धारदार शस्त्राचा वापर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास जामनेर पोलीस करत असून, पोलिसांकडून प्रकरणातील आरोपींची चौकशी आणि घटनेची माहिती घेतली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button